अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. यावेळी दोनशे दहा भाविकांनी रक्तदान करून साध्या पद्धतीने साईचरणी गुरुदक्षिणा अर्पण केली.
त्यामुळे संस्थान रुग्णालयातील हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियांसह अन्य शस्त्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला. लॉकडाउनमुळे संस्थान रुग्णालयात या शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या.
त्या मागील पंधरवड्यापासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संस्थानच्या रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा जाणवत होता. रोज दहा रक्तपिशव्यांची गरज भासत होती.
त्यामुळे गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून साईसंस्थानने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यास अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. काल दोनशे दहा पिशव्या रक्त संकलित झाले.
साईसंस्थानचे यापूर्वीचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी तिरुपती देवस्थानात केशदान, तर साईबाबांच्या शिर्डीत रक्तदान, असा उपक्रम सुरू केला. त्यास भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला होता.
मात्र, लॉकडाउनमुळे भाविक येण्याचा मार्ग आणि रक्तसंकलन बंद झाले. लॉकडाउनमुळे येथे भाविक येऊ शकत नाहीत. त्यामुळे तूर्त तरी साईसंस्थान कर्मचारी व काही ग्रामस्थ रक्तदान करून संस्थान रुग्णालयाची रक्ताची गरज भागवीत आहेत.
सध्या तरी रक्ताची गरज भागविण्यासाठी त्यांच्यावरच भिस्त आहे.साईसंस्थानने गुरुपौर्णिमेनिमित्त काल (रविवारी) आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात गरजेहून अधिक, दोनशे दहा पिशव्या रक्त संकलित केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews