Ahmednagar News : श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या गळीत हंगामात सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.
कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली तसेच सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२३- २४ च्या गळीत हंगामाबाबत माहिती देताना शिंदे सांगितले की, कारखाना कार्यक्षेत्रात सहा लाख टन ऊस उपलब्ध आहे.
तर एक लाख टन ऊस कार्यक्षेत्राबाहेरुन आणण्याचे नियोजन आहे. असे एकुण सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. यादृष्टीने आवश्यक ती तयारी व उपाययोजना करण्यात येत आहे.
अल्कोहोल तसेच इथेनॉल प्रकल्पांची क्षमता प्रत्येकी प्रतिदिन ४० हजार लिटर्सवरुन प्रतिदिन १ लाख लिटर्सपर्यंत वाढविली आहे. यामुळे अल्कोहोल व इथेनॉल उत्पादनात वाढ होवून कारखाना व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल.
यंदाचा गळित हंगामात ऊस टंचाईचे संकट असले तरी सभासद, शेतकरी, अधिकारी व कामगारांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी होईल, असे शिंदे यांनी सांगितले.