Ahmednagar News : राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द येथे सावकारकीचे पैसे घेण्या देण्याच्या कारणावरुन मोटारसायकलवर आलेल्या तिघा जणांनी विकी या तरुणावर काल सकाळी सत्तूर व कोयत्यासारख्या शस्त्रासह प्राणघातक हल्ला केला. यात हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की विकी सुरेश वैष्णवी (वय २७ वर्षे) हा तरूण राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहात आहेत. त्याने राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील एका सावकाराकडून काही महिन्यांपूर्वी १ लाख रूपये ४० टक्के व्याजदराने घेतले होते.
दरम्यान विकी याने ७० ते ८० हजार रुपए व्याज दिले, तरी देखील एक लाख रूपए मुद्दल व त्यावरील व्याजाच्या रकमेसाठी हा सावकार तगादा करीत होता. पैशाच्या व्यवहारावरुन दोघांमध्ये वाद सुरु होते.
विकी काल दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुरी खुर्द येथे हॉटेल भरतसमोर बसलेला होता. त्यावेळी तेथे एका मोटरसायकलवर आरोपी तोंडाला रुमाल बांधून आले.
काही कळायच्या आत त्या तिघा जणांनी विकी वैष्णवी याच्यावर सत्तूर, कोयत्यासारख्या शस्त्राने सपासप वार केले. तब्बल ११ वार करुन तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकी याला काही तरुणांनी तात्काळ राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यावेळी त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी विशाल अंबरे यांनी उपचार केले असता तब्बल दिडशे टाके पडले. यावेळी राहुरी येथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलिस नाईक रविंद्र कांबळे यांनी ग्रामीण रुग्णालय हजर राहुन विकी वैष्णवी याचा जबाब नोंदवून घेतला.