Nagar Urban Bank Scam : नगर अर्बन बँक घोटाळ्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या या बँक घोटाळ्याची सुनावणी सुरु आहे. माननीय न्यायालयात या घोटाळ्याबाबत सुनावणी सुरू असून यामध्ये सरकारी पक्षांच्या माध्यमातून आणि ठेवीदारांच्या माध्यमातून जोरदार युक्तिवाद सुरू आहे.
दरम्यान या घोटाळ्यात दोन दिवसांपूर्वी अर्थातच बुधवारी सीए तथा बँकेचा माजी तज्ञ संचालक शंकर घनश्याम अंदानी अटक करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा या आरोपीस अटक झाली असून गुरुवारी अर्थातच काल, 15 फेब्रुवारी 2024 ला जिल्हा व सत्र न्यायालयात या आरोपीला हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. सित्रे यांच्यासमोर सुनावणी झाली.
या सुनावणीत या प्रकरणाची तपासणी करत असलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी आतापर्यंतच्या संपूर्ण कारवाईची माहिती दिली. यावेळी तपास अधिकारी मिटके यांनी या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली जात असून ही माहिती पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली जात असल्याचे सांगितले.
आरोपी व त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता संदर्भातील माहिती मागवण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान अटक केलेल्या शंकरचे तत्कालीन बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी व इतर आरोपींशी जवळीक असल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे मयत गांधी संचालक असलेल्या दोन कंपन्यांचे ऑडिट केले असता यातील एका कंपनीच्या खात्यावरून शंकर अंदानी यांच्या खात्यावर दोन लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे शंकर यांच्या खात्यातून बँकेचे थकीत कर्जदार पटियाला हाऊस यांच्या खात्यात सहा लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत. यामुळे हा व्यवहार तपास अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटला आहे.
याशिवाय शंकर हे बँकेच्या सभांना वेळोवेळी हजर देखील राहिले आहेत. यावरून अटकेत असलेल्या या आरोपीने संगनमत करून गैरव्यवहार केला असल्याने स्पष्ट होत आहे. मात्र आता आरोपीकडून त्याला या गैरव्यवहाराच्या बदल्यात किती पैसे मिळाले आहेत, या पैशांची त्याने कशी विल्हेवाट लावली ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली.
यावर आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि कोठडी देऊ नये अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेऊन सदर आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता 20 फेब्रुवारी पर्यंत सदर आरोपी पोलीस कोठडीत राहणार आहे. दरम्यान या बँक घोटाळ्यातल्या आरोपीच्या मालमत्ता पोलिसांच्या माध्यमातून जप्त केल्या जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात शहरातील 58 आरोपींच्या मालमत्ताची माहिती घेऊन त्या जप्त केल्या जातील अशी माहिती तपास अधिकारी मिटके यांनी दिली आहे. दरम्यान कालच्या सुनावणीत माननीय न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना फटकारले आहे. फक्त एकच आरोपीला अटक झाली असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
याशिवाय या बँक घोटाळ्यात शहर सहकारी बँकेच्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर असलेला विजय मर्दा हा नगर बँकेतही आरोपी असताना त्याला अजून अटक झालेली नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच पोलिसांना फटकारले. यावेळी पोलिसांनी तो फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली. यामुळे या आरोपीसाठी लुक आऊट नोटीस जारी करणार असे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान यावर माननीय न्यायालयाने त्याचे पासपोर्ट जमा असताना तो फरार कसा झाला हा सवाल उपस्थित केला. याचा अर्थ तो बनावट पासवर्ड घेऊन फरार झाला आहे का? असाही सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
दरम्यान या सुनावणीत ठेवीदारांचे वकील एडवोकेट अच्युत पिंगळे यांनी एका फर्मचा 40 लाख रुपयांचा धनादेश स्वाक्षरी नसताना बँकेतून वटला गेला असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने निर्गमित केले आहेत.