अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

Published by
Ahmednagarlive24 Office

शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांच्या साई पालखी दिंडीला घारगावमध्ये ३ डिसेंबर रोजी अपघात झाला होता. त्यातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नागपूर अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत जाहीर केली.

आमदार थोरात म्हणाले, की वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसल्याने या अपघातात ताराबाई गंगाधर गमे (कोल्हाळे, राहाता), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी, राहाता), बाबासाहेब अर्जुन गवळी (मढी, कोपरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले.

अत्यंत गरीब कुटुंबातील हे वारकरी आहेत. मृत्युमुखी व जखमी वारकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क केला. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही.

मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत वर्ग करावी व जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा, अशी मागणी आमदार थोरात यांनी अधिवेशनात केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार थोरात यांची मागणी गांभीर्याने घेत

मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च सरकार देईल, असे जाहीर केले. यामुळे वारकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळणार आहे. याबद्दल वारकरी सांप्रदायाने आमदार थोरात यांचे आभार मानले.

Ahmednagarlive24 Office