अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्यात आले.
उपोषणाच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मनोज घुगे, डॉ. केव्हारे, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत व निरीक्षक देवकर यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन सुरक्षारक्षकांना जिल्हा रुग्णालयात पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणास आमदार संग्राम जगताप, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे, नगरसेवक अविनाश घुले, धनंजय जाधव, सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी देखील पाठिंबा दिला होता. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात संघटनेचे पदाधिकारी दीपक गुगळे,
अमित गांधी, अजय सोळंकी, शहानवाज शेख, संतोष उदमले, सचिन फले, किरण जावळे, शहाबाज शेख, फारुख शेख, मच्छिंद्र गांगुर्डे, मुसेफ शेख आदि सहभागी झाले होते. संघटनेच्या या आंदोलनाला यश आले असून, 17 कामगारांना गुरुवार दि.24 डिसेंबर पासून पुन्हा सेवेत हजर करुन घेण्यात आले.
कामगारांच्या न्याय, हक्काच्या मागणीसाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल जन आधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पोटे यांचा कामगारांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. दोन वर्षापासून अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत 17 सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते.
या सुरक्षारक्षकांनी 7 महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्याचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे 1 कोटी 30 लाख 74 हजार एवढा निधी मागे गेला.
सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर झाले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षारक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षारक्षक विरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसर्या संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षारक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नव्हता पाहिजे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये यासाठी सुरक्षा रक्षक बदलून घेण्याचे ठरविले आहे.
सर्व सुरक्षारक्षक यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते. तरी देखील त्यांना हजर करुन न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचा आरोप संघटनेने केला होता.