Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खिर्डी, खामपिंप्री, पिंगेवाडी, हातगाव व कांबी, या ७ गावाच्या शिवेवरून गेलेल्या पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, चालू वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत.
पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव तालुक्यातील जवळपास १२ ते १५ गावांना विस्थापित व्हावे लागले. विस्थापित झालेल्या सर्व गावांना धरणग्रस्त म्हणून इतरत्र वास्तव्य करावे लागले. शेवगाव तालुक्यातील जमिनीवर या धरणाची निर्मिती झाली असली तरी या जलाशयाचा मोठा फायदा मराठवाड्यासाठी धरण निर्मितीपासून आजही होत आहे;
परंतू वर नमूद केलेली गावे सोडली तर शेवगाव तालुक्यातील इतर गावांना धरणनिर्मितीसाठी जमिनी जाऊन काहीच फायदा होत नाही. या धरणातून शेवगाव व पाथर्डी या दोन शहरांना पिण्यासाठी पाणी पुरवले जात असून, या दोन्ही शहरांना सध्या पंधरा ते वीस दिवसांच्या फरकाने पिण्याचे पाणी मिळत आहे.
१०२ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात ७६ टक्के जिवंत साठा तर २६ टक्के मृत साठा रेकॉर्डवर नोंदवलेला असून, सध्या धरणात केवळ ८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून डावा व उजवा, असे २ कालवे गेले असून,
त्यामध्ये डावा कालवा नांदेडपर्यंत तर उजवा कालवा माजलगावपर्यंत १३२ किमी अंतरावर नेऊन तेथील धरणात झिरो केला आहे. मात्र, उजव्या कालव्यातून सटणाऱ्या पाणी आवर्तनातून शेवगाव तालुक्यातील वरील ७ गावांसह इतरही गावांना उपसा जलसिंचनमार्फत फायदा होताना दिसून येत आहे.