Ahmednagar News : भाजप सरकारने केलेली कामे प्रसिद्धी माध्यमातून आपणच ते काम केल्याचा कांगावा ते करीत आहेत. राहुरी शहरातील बाजारपेठ बंद पाडण्याचे खरे काम यांनीच केले.
डॉ. तनपुरे कारखाना बंद पाडून बाजारपेठ उध्वस्त केली आणि आता बाजारपेठा उद्ध्वस्त होऊ नये म्हणून निवेदन दिले जाते. सध्या विरोधकांना फक्त दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांना विरोध करणे एवढेच काम असल्याची टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आ. तनपुरे यांच्यावर नाव न घेता केली.
राहुरी येथे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरण मंजूर झालेल्या सुमारे ५३२ लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र माजी आ. कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कर्डिले म्हणाले, समितीचे काम खरोखर कौतुकास्पद असून निराधार आणि अपंग यांना आधार मिळाला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या जागेसंदर्भात काही न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात सर्व शासकीय इमारती एकाच ठिकाणी व्हाव्यात, यासाठी ग्रामीण रुग्णालय देखील मंजूर केले.
मात्र दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांना विरोध करण्याचे काम फक्त हे करीत आहेत. शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना देखील आम्ही मंजूर केली. मात्र त्याचे देखील श्रेय घेण्याचा यांनीच प्रयत्न केला. मात्र येथून पुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील कर्डिले यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नासंदर्भात आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे कर्डिले यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला.
यावेळी युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, बापूसाहेब वाघ, सर्जेराव घाडगे, नारायण घनवट, संदीप आढाव, दीपक वाबळे, अजित डावखर, प्रभाकर हरिश्चंद्रे, गणेश खैरे, बबन कोळसे, अशोक घाडगे, बाबासाहेब शिंदे, सचिन मेहत्रे, विलास मुसमुडे, अरूण साळवे, उमेश शेळके आदी उपस्थित होते.