Ahmednagar News : विवाह सोहळ्यात अनेकदा गर्दीचा फायदा घेत भुरटे चोरटे हात साफ करत असतात. मात्र येथे ऐन लग्नात ते देखील स्टेजवरून चक्क नवरीच्या मावशीचेच चार लाखांचे दागिने लंपास केले आहेत.
विवाह सोहळ्याची लगबग सुरू असताना चोरट्यांनी डाव साधत नवरीच्या मावशीचे ४ लाख १४ हजार ५६१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १ नोकिया कंपनीचा मोबाईल असलेली पर्स चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील नारायणडोह येथे असलेल्या शानिराज मंगल कार्यालयात घडली.
याबाबत रामदास तुकाराम जैद (वय ६४ रा.चिंचवड, पुणे) यांनी सोमवारी (दि. १) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जैद यांच्या नातेवाईकांच्या मुलीचा विवाह सोहळा नारायण डोह येथे असलेल्या शानिराज मंगल कार्यालयात रविवारी (दि.३०) दुपारी आयोजित करण्यात आला होता.
त्या विवाह सोहळ्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी आलेले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर स्टेज वर धार्मिक विधी तसेच नवरदेव नवरी समवेत फोटो काढण्यासाठी नातेवाईक व मित्र मंडळी यांची गर्दी झालेली होती.
फिर्यादी यांच्या पत्नी ही स्टेज वर गेल्या. त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व १ नोकिया कंपनीचा मोबाईल त्यांच्या जवळील पर्स मध्ये ठेवलेला होता. दुपारी २.४० ते २.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ४ लाख १४ हजार ५६१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १ नोकिया कंपनीचा मोबाईल असलेली पर्स फिर्यादी जैद यांच्या पत्नीची नजर चुकवून चोरुन नेली.
ही बाब उघडकीस आल्यानंतर आणि विवाह सोहळा पार पाडल्यानंतर सोमवारी (दि.१) सायंकाळी जैद यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.