Ahmednagar News : राहुरी तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना काल शनिवारी मध्यरात्री घडली. मोटारसायकलवर आलेल्या सात जणांनी एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरावर हातात दांडे घेऊन हल्ला केला. घरासमोरील गाड्यांची तोडफोड करत दुचाकी व चारचाकी वाहने पेटवली. नंतर पेट्रोलचे फुगे घरात फेकून घर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार निसार मगबूल सय्यद हे राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन तांदळवाडी परिसरात राहतात. गेल्या ३४ वर्षांपासून ते साप्ताहिक चालवत आहेत. काल दिनांक १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सय्यद हे त्यांच्या कुटुंबासह घरात होते.
त्यावेळी तीन मोटारसायकलींवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात सात जणांच्या टोळक्याने निसार सय्यद यांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी टोळक्याने घरासमोरील वाहनांची तोडफोड केली.
तसेच दुचाकी व चारचाकी वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि पेट्रोलचे फुगे घरात टाकून घर पेटवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान काल रविवारी तालुक्यातील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सय्यद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी सय्यद कुटुंबीयांची भेट घेतली.
ही घटना अतिशय निंदनीय असून गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही संघटनांकडन चाल आहे. याबाबत रिपाइंच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा साळवे यांनी दिला आहे.