अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील मेनरोड येथील व्यंकटेश मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने केला.
त्याच दिवशी तवेरा कार वडगावपानच्या जुन्या टोल नाक्याजवळ बेवारस आढळली. हीच कार मेनरोडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली.
चार दरोडेखोरांनी कार सोडून ट्रकमधून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. गुरुवारी मध्यरात्री तवेरा कार (एमएच ०४ सीटी १०१२) व्यंकटेश मोबाईल शॉपी फोडण्यादरम्यान मेनरोडला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
तीच कार पोलिसांना बेवारस आढळली. दरोडेखोरांची टोळी मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती, असे एकंदरीत पुढे येत आहे. मेनरोडला सोन्याच्या दागिन्यांची मोठी बाजारपेठ आहे.
सोन्याचे भाव देखील गगनाला भीडल्याने दरोडेखोरांचा दुकाने टार्गेट करण्याचा प्रयत्न असावा. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असताना त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
शहरातील मुख्य बाजारपेठ व मार्गांवर कॅमेरे बसवण्यासाठी पालिका व व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला. मात्र यंत्रणा अद्याप कार्यरत नाही.
पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी असोशिएशचे प्रकाश कलंत्री, सुनील दिवेकर, नगरसेवक किशोर टोकचे, जीवन पंचारिया, ज्ञानेश्वर कर्पे, दीपक भगत यांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख याच्याकडे निवेदनाद्वारे केली.