अहमदनगर बातम्या

निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न ! शेतीपिकांचे नुकसान ; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Published by
Ahmednagarlive24 Office

निळवंडे जलाशयातून डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लगत असणाऱ्या निळवंडे ते कळस या सर्व गावात कालव्यांचा पाझर अती प्रमाणात झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती नापीक झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान अती प्रमाणात झाले आहे, त्यामुळे निळवंडे कालव्याचे पाणी त्वरीत बंद करा.

या मागणीसाठी काल जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुनीता भांगरे व जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे या मायलेकांनी शेतकऱ्यां सह थेट कालव्यांवर जात कालवे फोडण्याचा प्रयन केला. दरम्यान पोलीसांच्या हस्तक्षेप नंतर पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी शेतकरी सकाळी ९ वा एकजुटीने कालवा फोडतील. या फोडलेल्या कालव्याच्या पाण्याने झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे त्वरीत पाणी बंद करावे, अशी मागणी सुनिताताई भांगरे, अमित भांगरे यांनी निवेदनद्वारे केली होती.

त्याप्रमाणे सकाळी खानापूर कालव्याजवळ सर्व शेतकरी जमा झाले. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नेते मिनानात पांडे, सुरेश गडाख, राजेंद्र कुमकर, विनोद हांडे, संतोष तिकांडे, बाळासाहेब भांगरे, महेश तिकांड, रामहारी चौधरी, रामहारी तिकांदे, विजय आवारी, भाग्यश्री आवारी आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसापासून निळवंडे जलाशयातून डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या अवर्तनामुळे कालव्याच्या लगत असणाऱ्या निळवंडे ते कळस या सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यांचा पाझर अती प्रमाणात झाल्यामुळे नापीक झाल्या. यामुळे शेतकरी हैराण झाला. याच पाश्र्वभूमीवर काल संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कालवा फोडण्याचा प्रयन केला.

यावेळी पोलीस व आंदोलक यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. हातात टिकाव खोरे घेऊन आलेल्या आंदोलकांना जमाव केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता. श्रीमती सुनीता भांगरे म्हणाल्या की, पूर्णपणे पाणी बंद करा. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतासह घरात घुसले असून ठीक ठिकाणी खट्टे पडले आहे. अपघाताची शक्यता आहे.

शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचा शेतीमाल वाया गेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात येत आहे. चाचणीच्या नावाखाली अकोले तालुक्यातील शेतकरी उध्वस्त करून सरकारला काय करायचे आहे ?

कालव्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानेच हा प्रकार घडला आहे. यास जबाबदार ठेकादरवर कारवाई करा. पाण्याचा एक थेंब पाणी देखील खाली जाऊ देणार नाही, असा इशारा ही भांगरे यांनी यावेळी दिला. आंदोलकांच्या वतीने पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पो. नि. विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कालवे फोडण्याचा इशारा देण्यात आल्या नंतर काल कलम १४४ लागू करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, तोपर्यंत हा लढा चालूच ठेऊ. मागे हटणार नाही, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी दिला.

Ahmednagarlive24 Office