श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी स्टेशन ते विसापूर स्टेशनच्या दरम्यान मोहरवाडी जवळ निजामबाद पॅसेंजरचा अपघात घडवण्याच्या उद्देशाने रेल्वेरुळावर अज्ञात इसमाने हेक्टोमीटर (सिमेंट) पोल ठेवला होता.
रुळावर टाकलेल्या पोलची माहिती रेल्वे ट्रॅकमॅनच्या लक्षात येताच घटनेची माहिती बेलवंडी रेल्वे स्टेशनमास्तरला फोनद्वारे कळवल्याने मोठी दुर्घटना टळली. ट्रॅकमॅनच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार गुरुवार दि.२१ रोजी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅकमन बेलवंडी स्टेशन येथे काम करत असताना बेलवंडी स्टेशन ते विसापूर रेल्वे स्टेशन दरम्यान मोहोरवाडी परिसरात कि मी नंबर ३१०/० च्या जवळ रेल्वे रुळावर कोणीतरी अज्ञात इसमाने हेक्टोमीटर पोल आडवा ठेवला असल्याची माहिती मुकादम जालिंदर भाना यांनी फोन वरून कळविली.
त्यानुसार ट्रॅकमन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मोठी रेल्वे दुर्घटना होण्याचा संभव असल्याने राजेंद्र यादव यांनी बेलवंडी स्टेशन मास्तरला फोन करून घटनेची माहिती दिली.
प्रसंगावधान राखत स्टेशन मास्तरांनी रेल्वे रुळावर जाणारी रेल्वे गाडी नंबर ११४०९ निजामबाद पॅसेंजर ही बेलवंडी स्टेशनला थांबवली. हेक्टोमीटर (सिमेंट) पोल रुळावरून बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
रेल्वे अडविण्याच्या उद्देशाने, रेल्वे संपत्तीला धोका पोहचवण्याचा, रेल्वेचे नुकसान करण्याचा आणि रेल्वे गाडी चालविण्यास अडथळा निर्माण केला म्हणून ट्रॅकमन राजेंद्र यादव यांच्या अज्ञात इसमाविरोधात फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.