अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- ऑनलाईन फिर्याद दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे विलंब होत असल्याच्या कारणावरून महिला पोलिस कर्मचारी भिमाबाई रेपाळे यांचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी सुपे येथील पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा तसेच लोकसेवकास त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहचविल्याप्रकरणी सोमवारी पहाटे सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी भिमाबाई रेपाळे या सुपे पोलिस ठाण्यात रात्रपाळीच्या डयुटीवर होत्या. रात्री साडेअकरा वाजता सुपे येथील बन्सी रामचंद्र कांबळे (रा. इंदिरानगर, मराठी शाळेजवळ, सुपा, ता. पारनेर) हे त्यांची मुलगी शिवाजी बन्सी कांबळे,
तेजश्री बन्सी कांबळे तसेच मंदा संपत गांगुर्डे (रा. सिदार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई) तसेच अशोक पिराजी जाधव (रा. सुपे, ता. पारनेर) यांच्यासमवेत फिर्याद देण्यासाठी आले होते त्यांची फिर्याद घेण्याचे काम सुरू असताना अचानक सर्व्हर डाऊन झाले.
त्यामुळे फिर्याद घेण्यास विलंब होत होता. त्यामुळे पाचही आरोपींनी ‘तुम्ही आमची फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहात’ असे म्हणून वाईट बोलण्यास सुरूवात केली.
त्यावर शिवानी कांबळे, तेजश्री कांबळे तसेच मंदा गांगुर्डे यांना भिमाबाई रेपाळे या समजावून सांगत असताना शिविगाळ करीत ‘तुझ्यावर खोटा अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून नोकरी घालविते’ अशी धमकी देण्यात आली.
रेपाळे यांच्या अंगास झटून शिवानी कांबळे हिने जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हातांनी गळा दाबला. तेजश्री कांबळे व मंदा गांगुर्डे या दोघींनी मारहाण करून जखमी केले, तर बन्सी कांबळे व अशोक जाधव यांनी त्यांना मदत करून सरकारी कामात अडथळा आणला.