अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या सिक्युएव्ही परिसरामध्ये चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी या चोरट्यांनी पुन्हा एकदा सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सीक्यूएव्हीच्या परिसराला वेढा दिला होता.
सुमारे दोन तास या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले मात्र पोलिसांची चाहूल लागताच चंदन चोर पळून गेले त्यामुळे पोलिसांच्या पदरी निराशा पडली आहे.
विशेष बाब म्हणजे दोन दिवसापूर्वी सीक्यूएव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
सीक्यूएव्ही हा परिसर सुमारे 20 ते 25 एकर मध्ये विस्तारलेला असून अत्यंत दाट झाडी असल्याने पोलिसांसमोर हे चोरटे शोधणे एक मोठे आव्हान आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये चंदनाची झाडे तोडण्यासाठी चंदन चोर येत आहेत. मध्यरात्री चोरटे परिसरामध्ये प्रवेश करतात आणि पहाटेपर्यंत झाड तोडतात.
मात्र भीतीपोटी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती मात्र आता चंदन चोरांचा सुळसुळाट जास्तच वाढल्याने याबाबत नागरिक बोलू लागले आहेत .