भाजप सरकारच्या पापाचे खापर आमच्या सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील के. के.रेंजच्या जमीन हस्तांतराचा मुद्दा थेट दिल्लीवारी करून आला आहे. जमीन हस्तांतराच्या मुद्यावरून उत्तरेकडील भूधारक शेतकरी चिंतेत होते. मात्र याबाबत तोडगा निघाला असून यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

यातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. के. के. रेंंजसाठी लष्कराला जमिनी देण्यावरुन मागील काही महिन्यात जिल्ह्यामध्ये वातावरण तापले होते. यातच विरोधी पक्ष भाजपकडून देखील सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला होता.

यातच आमदार लंकेनी एक गौप्यस्फौट केला. के.के.रेंजसाठी जिल्ह्यातील पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील 23 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींचे हस्तांतर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्यता दिली होती. 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती,

असा गौप्यस्फौट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. फडणवीस व भाजप सरकारच्या पापाचे खापर आमच्या सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा डाव उधळून लावला, असेही ते म्हणाले.

शनिवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. के.के. रेंज या प्रलंबित प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे आमदार लंके यांनी थेट शरद पवार यांनाच साकडे घातले होते. पवारांनी याबाबत लक्ष घालत संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणली. त्यानंतर आता केके रेंजचा प्रश्न मार्गी लागला आहे.

शेतकर्‍यांची जाणीव असणारे सरकार राज्यात आल्याने तसेच शरद पवार यांच्यामुळे या संकटावर आपण मात करू शकलो. राजकारणाच्या वेळी राजकारण करू. गोरगरीबांच्या जिवाशी का खेळता? असा सवाल लंकेनी केला.

शरद पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न मी कायमचा मार्गी लावणार आहे. के. के. रेंजचं मानगुटीवर बसलेलं भूत कायमचं काढून टाकणार आहोत, असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24