Ahmednagar News : सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत असून, अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली असून धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुसदृश परिस्थिती निर्माण झाली असून.
अद्याप देखील पाऊस कोसळत असून पुढील ४८ तास राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, अनेक भागातील नागरिकांचे स्थलांतर देखील केले आहे व काहींना तसे आदेश देखील दिले आहेत.

दरम्यान नगर जिल्ह्यातील चेरापुंजी समजले जाणाऱ्या अकोले तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. यापावसामुळे त्याभागातील भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारठली असून असाच पाऊस पडत राहिला तर जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याने भंडारदरासह सर्वच लहान-मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, धरणातून नदीपात्रात ७४४४ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
निळवंडे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या घाटघर, रतनवाडी, भंडादरा, पांजरे, बारी, कुमशेत, पाचनई, पेठेवाडी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले आहे
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. यात प्रामुख्याने कोकण व घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता वर्तण्यात आलेली आहे. त्यामुळे पालघर, पुणे व सातार घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
त्याचसोबत पुणे घाटमाथा, सातारा आणि पालघरला रविवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान शनिवारी पहाटेपासूनच जिल्ह्यासह पुणे शहर पिंपरी- चिंचवड भागात संततधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
सध्या खडकवासला धरण साखळीतून २८ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने या परिसरातील नागरिकाना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. रविवारी शहरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या भागातील नागरिकांची धडधड पुन्हा एकदा वाढली आहे.