अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शुभमंगल? सावधान ! अहमदनगरमधून बनावट लग्न लावणारी टोळी जेरबंद, लग्न लावलं की १५ दिवसात गायब होते पत्नी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News लग्न जमवणे व लग्न करणे आता फार जिकरीचे झाले आहे. मुलींची कमी असणारी संख्या, मुलामुलींच्या वाढत चाललेल्या अपेक्षा आदींमुळे मुली भेटणे व लग्न करणे या गोष्टी मुश्किल झाल्या आहेत.

याचाच फायदा काही लोक उठवताहेत. बनावट लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्या सध्या ठिकठिकाणी दिसून येत आहेत. आता अहमदनगरमधून लग्नात फसवणूक करणारी टोळी जेरबंद केली आहे.

बनावट नवरी उभी करून कोल्हार (ता. राहाता) येथील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. लग्नासाठी त्याच्याकडून तीन लाख वीस हजार रुपये घेण्यात आले. याबाबत फसवणूक करणाऱ्या बनावट नवरीसह चौघांची टोळी लोणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) जेरबंद केले आहे.

मयूर दशरथ गायकवाड याला विवाह करण्यासाठी मुलगी दाखवतो, असे म्हणून कुंडलिक चांगदेव शिंदे ऊर्फ सतीश शिंदे यांनी मध्यस्ती केली होती. त्याने दीपिका प्रवीण कांबळे हिचा विवाह झालेला असतानाही मयूर याच्याशी विवाह लावला. या बदल्यात शिंदे याने मुलाचे वडील दशरथ गायकवाड यांच्याकडून तीन लाख वीस हजार रुपये घेतले होते.

लग्न झालं , सगळं आलबेल होईल असे वाटत असतानाच लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांत नवरी पसार झाली. यानंतर दशरथ गायकवाड यांनी लोणी पोलिस ठाण्यात धाव घेत २३ डिसेंबरला फिर्याद दिली. लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी तपासाची सूत्रे हलवत आरोपी पुंडलिक चांगदेव शिंदे याची चौकशी केली.

त्याने रेश्मा ऊर्फ दिव्या रमेश चव्हाण, रोहिणी कैलास गायकवाड, दीपिका प्रवीण कांबळे (सर्व रा. बदलापूर, अंबरनाथ, जिल्हा ठाणे), पुंडलिक चांगदेव शिंदे ऊर्फ सतीश बाबासाहेब शिंदे (रा. तिळवणी, ता. कोपरगाव) यांची नावे समोर आणली. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office