अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशंकानुसार 8 ते 12 हजार रुपया पर्यंत वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांकडे गेले असताना तारखेला हजर न राहता एकूण वेतनाच्या फक्त 7 टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या ट्रस्टच्या विरोधात लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अरणगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकित गुरुवार दि.17 डिसेंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले.
या बैठकीसाठी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचरणे, सुनिता जावळे, बबन भिंगारदिवे आदिंसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवतार मेहेरबाबा ट्रस्टने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या सभासद नसलेल्या इतर कामगारांना शंभर रुपये तर पर्यवेक्षकांना तीनशे रुपये जास्तीचे वेतन दिले होते.
युनियनच्या वतीने आंदोलन करुन उर्वरीत रक्कम मिळवण्यात आली. ट्रस्ट व युनियनचा वेतनवाढीचा करार 2017 रोजी झाला होता. त्याची मुदत मार्च 2020 मध्ये संपली आहे. कोरोना महामारीचे कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याने, युनियनने सहा कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तीन तारखा होऊन देखील ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित राहिलेले नाही. हा प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
अॅड. कॉ.सुधीर टोकेकर म्हणाले की, कोरोनाकाळात कामगारांना पगार देण्यात आलेला नाही. या संकटकाळात सर्व कामगारांनी समजूतदारपणे मान्य केले. मात्र पगार वाढ न करणे व आडमुठीपणाचे ट्रस्टचे धोरण कामगारांना मान्य नाही. कोरोना काळात ट्रस्ट खरेदी व्यवहार करतात, मात्र कर्मचारी वर्गासाठी पगार वाढ दिली जात नाही. ट्रस्टचे इतर खर्च कमी केल्यास कामगारांना पगारवाढ देणे सहज शक्य होणार आहे. कामगारांचे सेवापुस्तक नसल्याने अनेक हक्कापासून त्यांना वंचित रहावे लागत आहे.
महागाई निर्देशंकानुसार 8 ते 12 हजार रुपया पर्यंत वेतनवाढ होऊन त्यांचे पगार 18 ते 22 हजार पर्यंत होणे अपेक्षित आहे. अवतार मेहेरबाबा ट्रस्टचा संपुर्ण डोलारा कामगारांवर टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व हा वाद मिटवण्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांना चर्चेला येण्याचे आवाहन केले. अॅड. कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, समान कामाला समान वेतन मिळणे हा कामगारांचा हक्क आहे.
इतर देवस्थान ट्रस्टच्या तुलनेत अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांना तोकडे वेतन देत आहे. महागाई वाढली असताना कामगारांना जगणे कठिण झाले आहे. सेवापुस्तक हे कामगारांचा आरसा असून, त्यांना सेवापुस्तक मिळणे देखील गरजेचे आहे. हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांचा हा संघर्ष असून, ट्रस्टने हा विषय चर्चेने सोडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.