अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- महाराष्ट्र राज्य हमाली मापाडी महामंडळाचे सहचिटणीस व अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष, नगरसेवक अविनाश घुले यांची सावित्री उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले, संगीताताई गाडेकर व श्रीकांत वंगारी यांनी दिली.
विचारधारा गेल्या तीन वर्षापासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी हा ‘सावित्री उत्सव’ या नावाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा करीत आहे. सावित्री उत्सव हा देशाचा महोत्सव व्हावा असा प्रयत्न देशभरातील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून ज्या शहरात सावित्रीबाई फुले शिकल्या त्या अहमदनगर शहरात सावित्री उत्सव मोठ्या प्रमाणत करण्याचा मानस असल्याने नगरसेवक अविनाश घुले यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
दिवंगत शंकरराव घुले यांच्या नंतर अविनाश घुले यांनी गेल्या अनेक वर्षापासून श्रमिक, कष्टकरी, माथाडी कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, टॅक्सी, रिक्षा ड्रायव्हर, पथारी व्यवसायिक, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. जातीय अत्यचार विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातूनही कार्यरत आहे.
त्यांच्या या कार्याचा आलेख पाहून विचारधाराने सावित्री उत्सवाचे पहिले स्वागताध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दि 3 जानेवारी ते दि 30 जानेवारी (म.गांधी स्मृतिदिन)पर्यंत जाहीर अभिवादन सोहळा, सावित्री-फातिमा पुरस्कार, व्याख्याने, अंक पुस्तक प्रकाशने असेविविध उपक्रम करण्यात येणार आहे, अशी माहिती विठ्ठल बुलबुले व संगीताताई गाडेकर यांनी दिली.
स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कष्टकरी कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे संघटक बापू जोशी, विवेक पवार, शिवाजी नाईकवाडी आदींनी अविनाश घुले यांचे अभिनंदन केले व अहमदनगर जिल्ह्यातून स्वागत होत आहे.