२२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अबब.. शहरातील तारकपूर परिसरात ऐन पावसाळ्यात जसे घरात पाणी शिरते अन् नागरिकांची दाणादाण होते, तशाच पद्धतीने गुलाबी थंडीत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.ही किमया निसर्गाने नव्हे तर महानगरपालिकेच्या जलवाहिनीच्या गळतीने झाली आहे.मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार या निमित्ताने पुढे आला आहे.
एकिकडे मनपा प्रशासन पाणीपट्टीची भरमसाठ वाढ करत असताना दुसरीकडे मात्र जलवाहिनीतून पाण्याची गळती होणे हे आश्चर्यकारक आहे.दरम्यान या परिसरात शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांनी भेट देवून पाहणी केली.मनपा प्रशासनाने पाण्याची गळती थांबवावी यासाठी श्री. गाडे आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, शहरातील तारकपूर भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती होऊन तीन गल्लींमध्ये पाणी साचले आहे. यामुळे घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना रोज पाणी बाहेर काढण्याचे कष्ट करावे लागतात.घरांच्या आतील भागात पाणी घुसल्याने नागरिकांची मालमत्ता देखील नष्ट झाली आहे.
महापालिकेने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत, पाणीपट्टी आणि मालमत्ता करात १००% वाढ केली आहे.मात्र, त्या बदल्यात नागरिकांना किमान मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत.पाणी गळतीमुळे निर्माण झालेल्या या समस्या विरोधात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, पण महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले,गेल्या ५-६ दिवसांपासून ही समस्या सुरू आहे आणि घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने तातडीने या गळतीचे निराकरण करावे.मी याबाबत महापालिका प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत.
नागरिकांची ही समस्या त्वरित सोडवली जावी, अशी अपेक्षा सर्वांमध्ये आहे.जर महापालिकेने यावर जलद कार्यवाही केली नाही,तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशारा त्यांनी दिला.