अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
दरम्यान निवडून आलेल्या दहा ग्रामपंचायत सदस्यांनी नुकतीच आमदार रोहित पवार यांची बारामती येथे भेट घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हास मान्य राहील अशी ग्वाही दिली आहे.
त्यामुळे असल्याने खर्डा ग्रामपंचायत व आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली असून माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांनी बुरे दिन आणले आहेत.
खर्डा ग्रामपंचायत मध्ये १७ सदस्य आहेत आत्ताच झालेल्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्य निवडून आले व दोन बिनविरोध आल्याने त्यांची सद्स्य संख्या सात झाली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,शिवकुमार गुळवे व दत्तराज पवार यांच्या प्रयत्नाने खर्डा शहरात ६ सदस्य निवडून आले तर ग्रामीण भागातून तुळशीदास गोपाळघरे व डॉ.अंकुश गोपाळघरे यांच्या नेतृत्वाखाली ४ सदस्य निवडून आले.
असे १० सदस्य आ.पवार यांच्या बरोबर राहणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या दोन ग्रुपमध्ये प्रथम अडीच वर्षे सरपंच पद कोणाला मिळते तर पुढील अडीच वर्षे सरपंच पद कोणाला मिळणार या बाबत खर्डेकरामध्ये उत्सुकता लागली आहे.
भाजपचे ७ ग्रामपंचायत सदस्य हे खबरदारी म्हणून सहलीवर गेले आहेत. आता राष्ट्रवादीच्या १० पैकी किती ग्रामपंचायत सदस्य गळाला लागतात यावर त्यांची नजर आहे, तर राष्ट्रवादीला मानणारे सदस्य सध्या खर्डा येथेच आहेत.