Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २६ जुलै २०२३ रोजी घडलेल्या दंगलप्रकरणी उंबरे येथून अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची काल मंगळवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश सुनावले. त्यानंतर लगेच जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केले.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक २६ जुलै २०२३ रोजी दोन गटात मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यानंतर मस्जिदवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. त्याच दिवशी रात्रीच्या दरम्यान पोलिस पथकाने उंबरे परिसरात तरूणांची धरपकड करत आरोपी जयवंत आसाराम पाषाण, राजेंद्र रायभान मोहिते, संदिप भाऊसाहेब लांडे, शेखर बाळासाहेब दरंदले, गणेश अशोक सोनवने, मारुती बाळासाहेब पवार, प्रतिक प्रकाश धनवटे, सचिन विजय बुऱ्हाडे, सुनिल उत्तम दाभाडे, शुभम संजय देवरे, नवनाथ भागीनाथ दंडवते, अभिषेक बाबासाहेब हुडे, कृष्णा ऊर्फ बबन सुनिल मोरे या १३ जणांना ताब्यात घेतले होते.
तसेच गौरव चांगदेव ढोकणे, किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, सौरभ संजय दुशिंग बबलू दत्तात्रय गायकवाड, अनिकेत कैलास तोडमल, अतुल जालिंदर ढोकणे, धनंजय दगडू भापकर, नितीन ढोकणे, भारत दुशिंग, धीरज शिवाजी पठारे, संतोष दाभाडे हे आरोपी पसार झाले होते. सलीम वजीर पठाण, रा. उंबरे यांच्या फिर्यादीवरून एकूण ४५ जणांवर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काल दिनांक १ ऑगस्ट रोजी सदर आरोपींची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी दुसरे सह दिवाणी महिला न्यायाधिश पी एस बिडकर यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडीचे आदेश पारित केले. त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून तात्काळ जामीन अर्ज ठेवण्यात आले. न्यायालयाने त्यावर आदेश देत सर्वांचे जामीन अर्ज मंजूर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती.