अहमदनगर बातम्या

बाळासाहेब थोरातांनी कोल्हेंच्या मदतीने विखेंचा राजकीय गेम केला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर – नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक कुरुक्षेत्राच्या लढाईचा फैसला सोमवारी (दि.१९) जाहीर झाला.

अटीतटीच्या अन्‌ चुरशीच्या लढाईत गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजव विखे पाटील यांच्या ‘जनसेवा’ पॅनलचे अक्षरशः राजकिय पानिपत झाले.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या माजी आमदार स्त्रेहलता कोल्हे यांचे सुपूत्र विवेक कोल्हे यांना रसद पुरवत विखे पिता-पुत्रांचा राजकिय ‘गेम’ केला.

महसूलमंत्री विखे पाटील यांचे ‘होम पिच’ कार्यक्षेत्र असलेल्या गणेश कारखान्यात थोरात-कोल्हेंनी विखेंना पराभवाची धूळ चारली, हे विशेष. कारखान्याच्या राजकिय लढाईत विखे पिता-पुत्रांना मोठा राजकिय धक्का बसला आहे. ही निवडणूक ‘गणेश’ थोरात-कोल्हेंना पावला तर विखे पिता-पुत्रांवर रुसला, अशीच म्हणावी लागेल.

नगर जिल्ह्यात जसा विखे पिता-पुत्रांचा राजकिय दबदबा आहे, तसाच दबदबा राज्याच्या राजकारणातही आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारात महसूलमंत्री म्हणून पहिल्या शपथविधीचा सन्मान ना. विखे यांना प्राप्त झाला होता. त्यावरुन ना.विखेंचा राज्यातील दबदबा सिद्ध झाला होता. राज्याप्रमाणेच केंद्रातही विखे घराण्याला मोठे महत्व आहे.

एकिकडे जिल्हा, राज्य व केंद्रात विखे घराण्याचा बोलबाला चालू असताना, दुसरीकडे मात्र विखेंना ‘गणेश’च्या निवडणुकीत मोठा हादरा बसला आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमुळे आता विखे व माजी आमदार स्त्रेहलता कोल्हे यांच्यातील पक्षांतर्गत वाद विकोपाला जाण्याची शक्‍यता आहे.

जसे आ.राम शिंदे व विखे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता, तशाच प्रकारे विखे व कोल्हे यांच्यात पक्षांतर्गत शीतयुद्ध सुरु झाले आहे. गणेश कारखान्याच्या लढाईत माजी महसूलमंत्री थोरात खऱ्या अर्थाने हिरो ठरले. शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र… या उक्तीप्रमाणे थोरातांनी विवेक कोल्हे यांना सोबत घेत विखे पिता-पुत्रांना गारद केले.

ही निवडणूक विखे पिता-पुत्रांनी त्याचप्रमाणे थोरात-कोल्हेंनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. ‘गणेश’च्या तब्बल १९ पैकी १८ जागा जिंकत थोरात-कोल्हे गटाने विखे गटाचे पानिपत केले. विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. खा. विखे हे विखे घराण्याचे चौथे वारसदार आहेत.

विखे घराण्याने अनेक राजकिय लढाया जिंकल्या व हरल्या. मात्र, गणेश कारखान्यात झालेला पराभव आतापर्यंतच्या राजकिय कारकिर्दीत सर्वात मोठा ठरल्याचे बोलले जाते. ‘गणेश’च्या ८२३४ मतदारांपैकी ७३३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिर्डी, राहाता, अस्तगाव, कुकडी ब पुणतांबा अशा ५ गटात मतदान झाले.

निवडणुकी दरम्यान दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या प्रचंड फेरी झडल्या. ना. विखे तसेच खा. विखे यांनी विरोधकांवर जहरी टीका केली होती. ‘गणेश’ची निवडणूक माणुसकी, विश्वास अन्‌ त्यागाची… असे भावनिक आवाहन खा.विखे यांनी केले होते तर ना.विखे यांनी लबाड लांडगं ढोंग करतयं…

बाहेरुन आलेले हे पाहुण्यांचे पार्सल पुन्हा संगमनेर आणि कोपरगावला पाठवा, अशी साद मतदारांना घातली होती. मात्र, विखे पिता-पुत्रांच्या भावनिक आवाहनाला मतदारांनी दाद दिली नाही, हे निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले. थोरात-कोल्हे यांनी ‘गणेश’ला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देवू, विखे पिता-पुत्रांची दडपशाही मोडित काढू, अशा प्रकारची दिलेली आश्वासने मतदारांना चांगलीच भावली, असेच म्हणावे लागेल.

माजीमंत्री के. शंकरराव कोल्हे यांनी तब्बल ३८ वर्षे कारखान्याचे सक्षमपणे नेतृत्व केले होते. २०१६ च्या लढाईत गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले होते. महसूलमंत्री विखे गटाने १९ पैकी १५ जागा बिनविरोध करून उर्वरित चारही जागा जिंकल्या होत्या.

प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून गणेश कारखाना चालविला जात असून,२०१६ च्या लढाईत झालेल्या पराभवाचा वचपा के. शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांनी भरुन काढला.

राहाता विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ‘गणेश’ वर थोरात-कोल्हेंचा झेंडा फडकल्याने आता विखे पिता-पुत्रांची मोठी राजकिय डोकेदुखी होणार असल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

Ahmednagarlive24 Office