Sangmner News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे नुकतेच लागलेले निकाल हे अनेक अर्थांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण व तितकेच अचंबित करणारे आणि धक्कादायक देखील ठरले. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मानहानीकारक पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागले.
या निवडणुकीतील जर आपण राज्यातील धक्कादायक निकाल पाहिले तर यामध्ये काँग्रेसच्या अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव झाला व अशाप्रकारे या नेत्यांचा झालेला पराभव हा महाराष्ट्राला देखील न पटणारा, न रुचणारा असाच आहे. यातीलच एक धक्कादायक निकाल आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव होय.
शिवसेना शिंदे गटाच्या नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला व पराभवाचा धक्का संगमनेर तालुक्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला बसला असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
परंतु आता या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघत बाळासाहेब थोरात यांनी नुकताच संगमनेर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला व या मेळाव्यातून त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
संगमनेर मध्ये 1985 पासून केली वेगळ्या पर्वाची सुरुवात
त्यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला धक्का बसला. पराभव तर दूरच पर्यंत आपल्याला मताधिक्य किती राहिल याचा आपण विचार करत होतो व या विचारात मात्र आपण गाफील राहिलो व सगळं होत असताना नंतर आपला पराभव झाला.
हा खरोखरच एक धक्काच होता असंच आपल्याला मान्य करावे लागेल असे देखील त्यांना म्हटलं. संगमनेर तालुक्यामध्ये 1985 पासून एक वेगळ्या प्रवाहाची आपण सुरुवात केल्याचे देखील त्यांनी नमूद केले व पुढे बोलताना म्हटले की, या सगळ्या कालावधीमध्ये आपण एक तालुक्याची वेगळी संस्कृती निर्माण केली व 40 वर्ष आपण देखील मला या ठिकाणाहून संधी दिली व प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने मला विधानसभेत पाठवले.
यावेळी देखील तुम्ही सगळे काम करत होतात व मी राज्यात फिरत होतो व आम्हाला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. या निवडणुकीत नेमकं काय झालं ते आज देखील मला समजत नाही व प्रत्येक जण वेगवेगळ्या कारण या निमित्ताने सांगत आहेत. आता जे दोष असतील ते निश्चित दूर करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
निळवंडे धरणाचे काम पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,निळवंडे धरणाचे सुरू केलेले काम पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलो. तसेच पाटबंधारे राज्यमंत्री असताना मंत्रिमंडळाच्या कामांमध्ये सहभाग घेतला व त्यानंतर राज्याचे कृषी तसेच शिक्षण व महसूल इत्यादी खाती यशस्वीपणे सांभाळली व अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे देखील त्यांनी म्हटले. ज्यावेळी महसूल खाते माझ्याकडे होते तेव्हा देखील मी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेकजण पुढे
तसेच निळवंडे धरणाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, जुन्या पिढीला याबाबतचा सगळा इतिहास माहिती आहे.परंतु आत्ताची जी काही तरुण पिढी आहे त्यांना याबाबत मात्र काही माहिती नाही. तालुक्यामध्ये 1985 मध्ये काय परिस्थिती होती आणि आज काय याचा विचार केला पाहिजे.
निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी आज अनेक लोक पुढे येत आहेत. मात्र त्यांचा यामध्ये सहभाग काय हे एकदा त्यांनी सांगावे असे बोलत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. इतकेच नाही तर संगमनेर शहराचा पाणी प्रश्न मी कायमचा सोडवला व थेट धरणातून पाईपलाईन संगमनेर शहरासाठी आणली.
मी राजकारण करताना कधीही जातीय भेदभाव केला नाही
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की 1985 च्या अगोदर संगमनेर शहराची ओळख एक दंगलीचे शहर म्हणून होती. जेव्हा मी आमदार झालो त्यानंतर असे प्रकार या ठिकाणी घडलेच नाहीत. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलो आणि दंगलींचे शहर ही जी काही संगमनेरची प्रतिमा होती ती पुसली.
मग विरोधकांना हे का दिसत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला. माझी मुस्लिम धार्जिणी प्रतिमा बनवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मात्र मी गणपतीची आरती केली तसेच सप्ताहात देखील गेलो आणि सगळ्या समाजाला घेऊन पुढे चाललो. हे का नाही दिसले? असा देखील प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.
माझ्याबद्दल जे काही विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे हा फक्त राजकारणासाठी केला जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. काही बाहेरच्या मंडळींचा संगमनेर तालुक्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होता असा आरोप देखील त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला.
आता पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,प्रवरा कारखान्याने आपल्या तालुक्यामध्ये गट ऑफिस सुरू केले आहे व आता त्यांचा पुढचा हल्ला आपल्या सहकारी संस्थांवर देखील राहील. कारण या ठिकाणी आता नवीन आमदार झाल्याने त्यांना हिम्मत झाली आहे व नवीन झालेला आमदार हे त्यांच्या हत्यार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,त्यांनी ( विखे पाटील) मंत्री झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली व अनेकांवर खोटे केसेस टाकल्या. सगळ्या परिस्थितीत माझ्याकडे पर्याय न होता व मी अन्याय सहन करू शकत नाही. त्यानंतर मी तिकडे गेलो आणि गणेश कारखाना ताब्यात घेतला.
मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे आणि काही झालं तरी देखील मी उभा राहणार असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिला. आम्हाला त्रास झाला तर मी लढणारच आहे आणि कोणत्याही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नाहीत असे देखील त्यांनी ठासून सांगितले.
तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे हा पराभव झाला हे लक्षात ठेवा व तुमच्या विश्वासावर मी राज्यात फिरलो. पण आता या सगळ्या गोष्टी दुरुस्त करायचे आहेत.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की आपले राजकारणाचे फाउंडेशन खूप पक्के आहे व यावेळी हे फाउंडेशन थोडेसे हलवल्याने ते कमकुवत होणार नाही. तुमची साथ द्या मी आता प्रत्येक गावात जाणार असून गावागावातील तट आणि गट आता थांबवणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.