जीवन कितीही प्रगल्भ झाले तरी अद्यापही अनेक व्याधी बालपणीच बालकांची पाठ धरत असतात. यामध्ये अधू दृष्टी किंवा दृष्टिदोष हे देखील आजकाल बालवयातच दिसून येतात. त्यामुळे अनेकांना लहान वयातच चष्मे लागतात.
त्यामुळे बालकांना शालेय जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. महत्वाची अडचण म्हणजे पाठ्यपुस्तकातील मजकूर वाचन करताना येणाऱ्या अडचणी. आता यावर बालभारतीने पर्याय शोधला आहे. बालभारतीने यंदा ‘लार्ज प्रिंट’ हा प्रयोग केला आहे.

ज्या मुलांना दिसायला कमी आहे अशा मुलांना शाळेतून ही मोफत पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. नगर जिल्ह्यात असे ४०४ विद्यार्थी असून त्यांना शिक्षण विभागाकडून ही पुस्तके वितरित झाली आहेत.
अंशतः अंध असलेल्या जिल्ह्यातील ४०४ विद्यार्थ्यांना (लो-व्हिजन) ही पाठ्यपुस्तके शाळेतून मोफत मिळालेली आहेत. समग्र शिक्षा अभियानातून दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात.
परंतु, दृष्टी कमजोर असलेल्या मुलांसाठी त्यातील अक्षरे वाचणे त्रासदायक ठरते; त्यामुळे अधू दृष्टीचे बालक हुशार असूनही अभ्यासात मागे पडण्याचा धोका निर्माण होतो. त्यांच्यासाठी या ‘लार्ज प्रिंट’चा हा प्रयोग केला आहे.
बालभारतीच्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य ‘असे’ आहेत
नियमित विद्यार्थ्यांना ए फोर तर अंशतः विद्यार्थ्यांसाठी तीच पुस्तके ए थ्री म्हणजेच अडीचपट आकाराची असून या पुस्तकात आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या पुस्तकातील अभ्यासक्रम, घटकांची क्रमवारी सारखीच आहेत. फरक इतकाच की, या पुस्तकात अक्षरे दुप्पट मोठ्या आकाराची, ठळक आणि सहज वाचता येतील अशी आहेत.