अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-तळेगाव दिघे येथे शेतीसाठी दोन दिवसातून केवळ आठ तासच वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळून चालली आहेत.
यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.८) तळेगाव चौफुलीवर एक तास रास्तारोको आंदोलन छेडले. या रास्तारोकोमुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
खंडित वीज पुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाल्याने संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शेतकरी आक्रमक झाले आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतास पाणी भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे तळेगाव दिघे येथील शेतकरी आक्रमक व संतप्त झाले.
याप्रश्नी आंदोलनाचे निवेदन देवूनही वीज पुरवठा सुरळीत न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी ( दि.८) तळेगाव दिघे येथील चौफुलीवर रास्तारोको आंदोलन छेडले.
वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाधव यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
शेतीसाठी वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच रमेश दिघे यांनी यावेळी दिला.