अवकाळीच्या धास्तीने बळीराजा हवालदिल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील चापडगाव, बोधेगाव कृषी मंडळामध्ये कांदा, ज्वारी, बाजरी, आदी पिकांची काढणी चालू असून, ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चालू वर्षी जेमतेमच पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत अपेक्षित एवढी वाढ न झाल्याने रब्बीसह उन्हाळी हंगामाला मोठा फटका बसला आहे. थोड्याफार पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा, गहू, ज्वारी, आदी पिकांची लागवड केली असून, ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने वातावरण तयार झाल्यामुळे बळिराजा हवालदिल झाला आहे.

दरवर्षी या कालखंडात अवकाळी पाऊस येत असल्याने याचा शेती क्षेत्राला मोठा फटाका बसत असल्यामुळे शेतीचे अर्थकारणच बदलू लागले आहे. पुर्व भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई बरोबरच अवकाळीचा फटका बसत असल्यामुळे या भागातील शेतीला कायमच अडचणीचा सामना करावा लागत आहे.

शेवगाव माळेगांव रस्त्यावर गहीले वस्ती परिसरात दुपारी (दि. ११) झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली असून, वाळवून ठेवलेल्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच महावितरणच्या विद्युत वाहिन्यांचे पोल मोडून पडल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच काढलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

आधीच कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या बळीराजाला अळकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला खास हिरावून घेतला जातो की, काय याची चिंता वाटू लागली आहे. या दुहेरी संकटाने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले आहे.