अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षांपासून अनेक सण उत्सवांवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे.
यातच आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या अनुषंगाने अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील मंदिरे उघडण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सहा प्रमुख ठिकाणी नवरात्र उत्सव करण्यास मनाई केली आहे.
संबंधित ठिकाणी आजपासून ते 20 ऑक्टोबर पर्यंत या भागात कलम 144 लागू असेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील या सहा ठिकाणी 144 कलम लागू केला आहे. या ठिकाणी दिवसाच्या दर्शनसाठी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी दररोज पाच हजार भाविकांसाठी दर्शन पासेसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी, कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवी मंदीर, केडगाव येथील रेणूका माता देवी मंदीर, एम.आय.डी.सी परिसरातील रेणूका माता देवी मंदीर, भिस्तबाग येथील रेणूका माता देवी मंदीर, बु-हाणनगर येथील तुळजा भवानी मंदीर या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कलम 144 लागू केले आहे.