Ahmednagar News : वेगवेगळी आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्या धर्मप्रचारकांना गावबंदी करा. अशी एकमुखी मागणी राहुरी तालुक्यातील उंबरे येथे बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत नागरिकांनी केली आहे.
त्याच सोबत धार्मिक, शिक्षण, आरोग्य, विकासकामांच्या निविदा अशा विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. यावेळी गावात पशुहत्या बंदी, दारु बंदी, तसेच बाहेरील धर्मप्रचारकांना गाव बंदी असे अन्य महत्वपूर्ण ठराव पास करण्यात आले.
गावातील हनुमान मंदिराजवळ ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश साबळे तर सभेसाठी ज्येष्ठ नागरिक भाऊराव ढोकणे, माजी सरपंच संतोष ढोकणे, आदिनाथ महाराज दुशिंग, सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय ढोकणे, संचालक राजेंद्र दुशिंग, गंगाधर आडसुरे, भाऊराव सासवडे, संजय आडसुरे, संजय ढोकणे, ज्ञानेश्वर तरवडेआदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. ग्रामसेवक मुरलीधर रगड यांनी विषय वाचन केले. यावेळी गावात पशुहत्या बंदी करावी, बाहेरील धर्मप्रचाराकांना गावबंदी करावी, गावात स्वच्छतागृहे उभी करावीत, तणनाशक व डास निर्मुलन फवारणी करावी, मराठी शाळेचा पाचवीचा वर्ग बंद करून तो हायस्कुलला जोडावा, आरोग्य केंद्रात चोवीस तास सेवा मिळावी, गावातील एका समाजाच्या स्मशानभुमीचे स्थलांतर करावे, तसेच दावलमालिक यात्रेबाबतही तरुणांनी आपापली मते व्यक्त केली.
तसे ठरावही घेण्यात आले. बसस्थानक ते भंडारी चौक रस्त्याच्या कामाची चौकशी करून ते काम पुन्हा करून घ्यावे, निकृष्ट कामे करणाऱ्या बाहेरील ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशा सुचनाही सभेपुढे आल्या. सभेने एकमताने हा ठराव पास केला. आभार सरपंच सुरेश साबळे यांनी मानले.