बीअरबार उघडले, चित्रपटगृह उघडलीत, रेल्वे सुरू झाली मग मंदिरे का उघडली जात नाहीत?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- अधात्माशिवाय माणसात बदल होऊ शकत नाही. अध्यात्म माणसाला बदलू शकते, याच्यावर माझा विश्वास आहे. मात्र, मंदिर उघडताना राजकारण करू नये.

बीअरबार उघडले, चित्रपटगृह उघडलीत, रेल्वे सुरू झाली मग मंदिरे का उघडली जात नाहीत? असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना हजारे यांनी मंदिरे उघडण्यात राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाविक व वारकऱ्यांनीही मंदिरे उघडण्यावरून सरकारवर टीका केली आहे. भाजपनेही यासाठी आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर आता हजारे यांनीही मंदिरे उघडण्याची मागणी केल्याने सरकार त्याची तरी दखल घेते की नाही, याची उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याबाबत महाविकास आघाडीने सुतोवाच केले आहे.

त्यामुळेच आता मंदिरांचा विषय ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. हजारे यांनी या मुलाखतीत त्यांची कथित निवृत्ती, लोकपाल कायदा, राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे काम, सत्ता व पैशांचे राजकारण यावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाष्य करताना सरकारवर टीकाही केली. मी गेल्या 40 वर्षांपासून आंदोलन करीत आहे.

यातून माहितीचा अधिकार, लोकपाल आणि दफ्तर दिरंगाई यासारखे 10 कायदे देशाला दिले. माहिती अधिकारातील कलम क्रमांक 4 ची अंमलबजाणी सरकार करत नसल्याने काही लोक याचा गैरफायदा घेतात, असा दावाही त्यांनी केला. आजचे राजकारण ध्येयवादी राहिलेले नाही. नेत्यांमध्ये दूरदृष्टी, सामाजिक दृष्टीकोन नाही.

आता फक्त सत्ता आणि पैसा यासाठी राजकारण सुरू आहे, असाही दावा करून अण्णा म्हणाले, लाखो लोकांचे बलिदान राजकारणी विसरले आहेत. सध्याच्या राजकारणातून सेवाभाव दूर गेला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. वयाच्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन समाजसेवेचे व्रत मी माझ्या आयुष्यात स्वीकारले आहे.

त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत गाव, समाज आणि देशाची सेवा करणार आहे, असे सांगून ते म्हणाले, दसऱ्याच्या ग्रामसभेत मी नवीन कार्यकर्ते पुढे येत असल्याने त्यांच्यावर जबाबदारी टाकणार असल्याचे म्हणालो. मात्र, समाज कार्यातून मी मुक्त होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24