Ahmednagar News : तालुक्यातील पर्यटकांचे आणि ट्रेकर्सचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हरिश्चंद्रगडाजवळ कोथळे गावातील भैरवनाथ गडावर गेलेल्या पुण्यातील (कोथरूड) १३ पर्यटकांवर मधमाश्यांनी नुकताच हल्ला केला. त्यात सर्व १३ तरुण, तरुणी गंभीर जखमी झाले आहे.
या हल्ल्यातील गंभीर जखमींवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.७) दुपारी ही घटना घडली. कोथरूड (पुणे) येथील १३ तरुण तरुणी शनिवारी रात्री मिनीबसने निघून रविवारी पहाटे हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात आले.
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला पाचनई या गावात येथे हॉटेलमध्ये चहा-नाष्टा करून ते सकाळ हरिश्चंद्रगडाजवळच असलेल्या कलाडगडावर गेले. तेथून दुपारी पुन्हा पाचनई येथे आले. तेथे जेवण करून ते सर्व जण हरिश्चंद्रगड परिसरातच असलेल्या कोथळे येथील भैरवनाथ गडावर जाण्यास निघाले.
तेव्हा गडावर चढत असताना दुपारी दीडच्या सुमारास ते देवराईजवळ थांबले होते. तेथे तेथे नाष्टा करत असताना कुडांजवळ मधमाश्या आल्यामुळे या तरुणांनी गवत पेटवून धूर केला. त्यामुळे मधमाश्यांनी ऊग्र रूप धारण केले. असंख्य मधमाश्यांनी तरुण-तरुणींवर हल्ला चढविला.
हात, पाय व चेहऱ्यावर तसेच शरीरावर सर्वत्र डंख मारण्यास सुरुवात केली. बहुतांश तरुण इतरत्र लपले, तर काही कोथळा गावात पळाले. दरम्यान, कोथळे गावकऱ्यांनी कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता,
पडवळ व कर्मचारी तातडीने पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य घेऊन कोथळा येथे गडावर पोहोचले. मधमाश्यांनी हल्ला केलेल्या काही तरुणांना आधार देत कोथळे गावात ५ ते ६ तरुणांना आंघोळ घालून रुग्णवाहिकेतून राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय लहामटे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार केला.
मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये शर्वरी धनंजय करवरकर (वय २४), भार्गवी श्रीकांत कुलकर्णी (वय २०), प्रज्ञा तुषार ढेरे (वय ४०), ममता मुकुंद भरताया (वय २४), जयदेव सुनील पिंपरे (वय ३५), अक्षय माधव डोंगरे (वय ४२),
नितीश अनिल बापट (वय ३७), अनिल अनिश बापट (वय ३४), अंकित किरण कुलकर्णी (वय ३०), अतुल सूर्यकांत कामटे (वय ४७), अंबरिश नारायण कान्होरे (वय ३१), स्मिता राजन दाबळे (वय ३१), अमोल विवेक नान्नल (वय २३) यांचा सामावेश आहे.