प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये चार वर्षांमध्ये निम्म्याने घट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये चार वर्षांमध्ये निम्म्याने घट झाली. राहुरी मतदार संघातील नगर, पाथर्डी आणि राहुरी तालुक्यातील १ लाख २७ हजार शेतकरी लाभार्थ्यांपैकी केवळ २५ हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ झाला असून अन्य शेतकरी कशामुळे अपात्र ठरले आहेत? असा सवाल आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

सध्या विधानसभेचे अधिवेशन मुंबईत सुरू असून आ. तनपुरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर लक्षवेधीद्वारे सभागृहात प्रश्न उपस्थित केले आहेत.आ. तनपुरे यांनी शेतकरी सन्मान योजनेबाबत प्रश्न उपस्थित करून म्हटले, पी.एम. किसान योजना फेब्रुवारी २०१९ला सुरू करण्यात आली. यावेळी नगर जिल्ह्यात या योजनेचा पहिला हप्ता ६ लाख ८७ हजार ४०० शेतकऱ्यांना देण्यात आला.

मात्र मागील शेवटचा १३वा हप्ता केवळ ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना देण्यात आला. म्हणजेच निम्म्याहून अधिक लाभार्थी शेतकरी अपात्र ठरले आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघातही अशाच पद्धतीने शेतकऱ्यांची संख्या कमी कमी होत गेली आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली असल्याचे आ. तनपुरे यांनी नमूद केले. राहुरी विधानसभा मतदारसंघात शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता ४५ हजार शेतकऱ्यांना प्राप्त झाला. मात्र शेवटचा १३ वा हप्ता केवळ ८ हजार शेतकऱ्यांना मिळाला.

पाथर्डी तालुक्यातील ५० हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला, आणि १३ वा हप्ता ८ हजार शेतकऱ्यांना मिळाला. तसेच नगर तालुक्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला तर केवळ ९ हजार ८०० शेतकऱ्यांनाच या योजनेचा १३वा हप्ता प्राप्त झाला. कोणत्या कारणांमुळे हे शेतकरी अपात्र झाले आहेत? असा सवाल तनपुरे यांनी सभा सभागृहात उपस्थित केला.