Bhandardara Dam : भंडारदरा धरण काही तासांत भरणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे असणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ४१५ दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे.

धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाल्यानंतर भंडारदरा धरण शाखेकडून धरण भरल्याचे दरवर्षी घोषित होत असते.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले धरण आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यासह संपुर्ण अहमदनगर जिल्ह्याचे भंडारदरा धरण कधी भरते याकडे लागलेले असते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रोज संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८३ टक्के होताच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर पोहचताच पुन्हा प्रवरा नदीमध्ये विसर्ग सुरु करण्यात आला; परंतु तरीसुद्धा धरणाचा पाणीसाठा १० हजार ४१५ दशलक्ष घनफूट झाला आहे. दरवर्षी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा साडेदहा टीएमसी होताच धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे घोषित होत असते. भंडारदरा धरण भरण्याची अधिकृत घोषणा जलसंपदा विभागाकडुन कधी होते? हा प्रश्न अजुनही गुलदस्त्यात आहे. मात्र भंडारदरा धरण सोमवारी सकाळी तांत्रिकदृष्ट्या भरणार असल्याचे चित्र आहे.

भंडारदऱ्यातुन पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठाही ८३ टक्के झाला आहे. धरणामध्ये ६ हजार ९१९ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले आहे. निळवंडे धरणाच्या सांडव्यातुन २ हजार क्युसेक तर वीजनिर्माण केंद्रातून ८०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. गेल्या २४ तासात भंडारदरा येथे ३० मीमी पाऊस पडला असुन घाटघर येथे ६३ मीमी, पांजरे ४१ मीमी, रतनवाडी ५९ मीमी तर वाकी येथे १९ मीमी पावसाची नोंद झाली. वाकी बंधाऱ्यावरून कृष्णावती नदीत १९७ क्युसेकने पाणी वाहत आहे.

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाला तरी धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे भंडारदरा धरण शाखेकडून जाहीर केले जाणार नाही. पाणीसाठा ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट झाल्यावरच धरण १०० टक्के भरले, असे गृहीत धरावे, अशी माहीती भंडारदरा धरण शाखेकडुन रात्री उशिरा प्राप्त झाली आहे.