अहमदनगर बातम्या

Bhandardara Tourism : गुलमोहरच्या फुलांनी भंडारदराच्या निसर्ग सौंदर्यात भर !

Published by
Ahmednagarlive24 Office

पिवळसर गुलाबी रंगछटांनी नटलेल्या ‘पॅथोडीया’ ऊर्फ गुलमोहरांच्या फुलांनी भंडारदऱ्याच्या निसर्गात भर टाकली आहे. रस्त्याच्या कडे कडेला असणारी गुलमोहराची फुललेली ही झाडे पर्यटकांचे आकर्षण बनत आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याला निसर्गाची अनोखी देणगी मिळालेली आहे, भंडारदऱ्याच्या या निसर्गात पावसाळ्यात खळखळुन वाहणारे धबधबे, डोंगराच्या चढउतारावरील फुलोत्सव तसेच पावसाच्या अगोदरचा भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहे, याच बरोबर भंडारदऱ्याच्या निसर्ग पर्यटनाबरोबरच पर्यटकांच्या साहसाला अवहान देणारे गडकिल्लेही याच निसर्गात उपलब्ध आहेत.

याच निसर्गात एक आस्टेलियन झाड पर्यटकांना भुरळ पाडत आहे, पॅथोडीया नावाने ओळखले जाणारे हे झाड म्हणजेच गुलमोहर, हे झाड साधरणता नोव्हेंबर ते मार्च-एप्रिलपर्यंत फुललेले दिसुन येते, या झाडांसाठी भंडारदऱ्यात पोषक वातावरण असल्याने ३० ते ४० वर्षांपूर्वी लागवड केली गेली असून आज त्याचे मोठ्या वृक्षांमध्ये रुपांतर झाले आहे.

भंडारदरामध्ये वनविभागाच्या तसेच भंडारदरा धरण शाखेच्या आवारातही ही झाडे दिसुन येतात. या झाडांच्या फुलांचा वापर रंग बनविण्यासाठीही उपयोगी येतो, झाडाला छोटी छोटी बोंडे येत असुन त्यात पाणी निघत असल्याकारणाने लहान मुले या बोंडांचा वापर पिचकारी म्हणुनही करतात.

फुलांच्या गळतीनंतर या झाडाला एक ते दिड फुटाच्या लांब आकाराच्या शेंगा येतात, या शेंगाचा वापर औषधासाठी जुने लोक करताना दिसुन येतात, झाडाच्या लाकडाचा उपयोग सरपण म्हणुन जाळण्यासाठी केला जातो, हे झाड माणसांनाच नव्हे तर पक्षांनाही आकर्षित करत असल्याने विविध पक्षांचा वावर या झाडावर आढळुन येतो,

पॅथोडीया हे झाड ठिसुळ असल्याने इमारतीसाठी या झाडांच्या लाकडाचा वापर होत नाही, त्यामुळे या झाडांची वृक्षतोड सहसा होत नाही, झाडांचे बिज प्रसारण होत असल्याने या झांडांची वनविभाग तसेच भंडारदरा धरण शाखेने धरण परिसरात तसेच अभयारण्यात जर लागवड केली गेली तर निश्चितच भंडारदऱ्याच्या पर्यटनात आणखी भर पडेल.

Ahmednagarlive24 Office