तीन तपाहून अधिक काळ गणितासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना शिकवणे, हे मोठे कठीण काम असते. हे दिव्य पार पाडताना विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय शिक्षक अशी ओळख निर्माण करणे, हे आव्हानात्मक काम भानुदास कोतकर यांनी केले आहे. त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते संजय कळमकर ह्यांनी व्यक्त केले. निंबळक येथे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर ह्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, दै. लोकआवाज संपादक विठ्ठल लांडगे, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबन डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी विलास मुनोत, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. माजी कुलगुरू, डॉ. सर्जेराव निमसे म्हणाले की, शिक्षकांवर समाज घडविण्याची मोठी जबाबदारी असते. श्री. कोतकर यांनी त्यांची जबाबदारी नेटकेपणाने पार पाडली आहे. त्यांनी त्याग आणि समर्पित वृत्तीतून ज्ञानदानाचे काम करतांनाच, माध्यमिक विद्यालयात सामाजिक सहभागातून पायाभूत सुविधांचा विकास केला, ही कौतुकास्पद बाब असून इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून श्री. कोतकर ह्यांचा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी धीरज खराडे, ज्योतिष अभ्यासक संतोष घोलप, प्रा. संजय जाजगे, नंदकुमार तोडमल आदींची भाषणे झाली. उपस्थित मान्यवरांनी श्री. भानुदास आणि श्रीमती मनिषा कोतकर ह्या उभयतांचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिदल सैनिक संघटना, निंबळक क्रीडा मंडळ, साने गुरुजी प्रतिष्ठानचे सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी संगीता जाजगे ह्यांनी उत्कृष्ट निवेदन केले तर प्रताप बांडे ह्यांनी आभार मानले.
‘कळमकरांचे चिमटे’
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय कळमकर ह्यांनी आपल्या विनोदी शैलीने उपस्थितांना खळखळून हसवले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त इतर शासकीय कामांचा अतिरिक्त ताण पडत असून शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी करतांना ज्ञानदानाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले. राजकारण आणि सध्याची सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती ह्या विषयांवर मार्मिक टिप्पणी करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तर विठ्ठल लांडगे ह्यांनी श्री. कोतकर ह्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात झाला नसल्याची खंत व्यक्त केली.