भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले… आणि क्षणात त्याचा प्राणही गेला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-भरधाव पद्धतीने वाहने चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असतात.

असाच एक अपघात जिल्ह्यात घडला आहे. मात्र या अपघातात एका निरपराधांचा बळी गेला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात शुक्रवारी (दि.२२) पहाटे झालेल्या अपघातात निलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय ३०, रा.जेऊर, ता.नगर) हा जागीच ठार झाला आहे.

या अपघाता बाबत अधिक माहिती अशी की, जेऊर शिवारातील टोलनाक्यावर निलेश मेहत्रे व त्याचा भाऊ गोरख मेहेत्रे फुल व हार विक्रीचा व्यवसाय करत होते.

पहाटे साडेपाचच्या सुमारास नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो (क्र. एम.एच.-१२, आर.एन. १९९९) टोलनाक्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक कठड्याला धडकून उलटला.

यावेळी कठड्याजवळ हार विकण्यासाठी उभारलेल्या निलेश मेहत्रे याला जबर मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी परिसरातील काहींनी अपघातग्रस्तांना मदत केली.

घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. दरम्यान या अपघातात निरपराध निलेश मेहेत्रे याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एम.आय.डी.सी. पोलीस पथक हजर झाले होते.

घटनेचा पंचनामा करण्यात आला असून महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24