Ahmednagar News : काही दिवसांपासून देशातील विविध छावणी परिषदांचे नजिकच्या नगरपालिका आणि महापालिकांकडे हस्तांतरणाचा विषय चर्चेत आहे. सैन्य तळ सोडून देशातील १४ आणि महाराष्ट्रातील ६ छावणी परिषदांच्या नागरी परिसराचे विनामूल्य हस्तांतरणास केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच महापालिका क्षेत्रात भिंगार छावणीचा समावेश होणार आहे.
२५ जून रोजी झालेल्या बैठकीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याबाबत नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट परिसराला मूलभूत सुविधा आणि नागरी मालमत्तेवरील मालकी हक्क राज्य सरकार किंवा नगरपालिकांना विनामूल्य हस्तांतरित केले जाणार आहेत.
संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांचे या संदर्भातील पत्र नगरच्या छावणी मंडळाला प्राप्त झाले आहे. यात भिंगार शहर अहमदनगर कॅन्टोन्मेंटचाही नगरपालिका सेवा पुरविण्यासाठी समावेश आहे.
संरक्षणखात्याने इमारतीच्या बांधकामांबाबत काही प्रमाणात नियम शिथिल केले आहेत. मात्र, भिंगार शहरात सध्या एकमेक्षा अधिक एफएसआय मिळत नाही. त्यामुळे इमारतींच्या बांधकामावर मर्यादा येतात.
परिणामी, नागरिक लगतच्या शहरात अथवा ग्रामपंचायत क्षेत्रात स्थलांतरीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. जर भिंगारचा महापालिकेत समावेश झाल्यास वाढीव एफएसआय मिळेल वबांधकामांवरील मर्यादा दूर होतील, अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.
नगर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या छावणी मंडळाच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्टी आहे. राज्य शासन अथवा महापालिकेच्या मालकीची ही जागा नसल्याने येथे सुविधा देण्यास अडथळे येतात.
ही जागा भविष्यात राज्य सरकार किंवा मनपाकडे हस्तांतरित झाल्यास झोपडपट्टी विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, छावणी मंडळाची व्यापारी संकुलेही मनपाकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.