राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. अशावेळी राज्य सरकारनं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात पहिली कारवाई केलीय. चंद्रपुरातील 14 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन आज करण्यात आलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलीय.
दिवाळीपूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली होती. तर चंद्रपुरातून अनिश्चित कालीन संपाची घोषणा झाली होती. त्यानंतर आज चंद्रपुरातील 14 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र, विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केलीय.
हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनिमय करेल. हायकोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर करुनही हा संप सुरुय. कोर्टानं सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं