अहमदनगर बातम्या

मोठी बातमी ! ऐन सणोत्सवात राज्यावर भारनियमनाचे संकट

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  कोळसा टंचाईमुळे महावितरणच्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद पडल्याने राज्याला होणार्‍या वीज पुरवठ्यापैकी तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे.

परिणामी राज्यात अनेक ठिकाणी अल्प वेळेसाठी अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. दरम्यान, दीर्घ काळासाठीचे भारनियमन टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे.

त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॉटचे तसेच पारस- २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे.

यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॉटचे तीन संच बंद आहेत.

यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे. दरम्यान बाजारातून सुमारे अडीच हजार मेगावॅट विजेची खरेदी सुरू असून सणासुदीच्या दिवसांत भारनियमन होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोळसा खाणीच्या परिसरात सुरू असलेली अतिवृष्टी आता थांबल्यामुळे कोळसा उत्सखनन सुरू होण्याची राज्य सरकारला अपेक्षा आहे.

असे झाले तर विजेचे हे संकट टळू शकणार आहे. देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कमी होत आहे.

Ahmednagarlive24 Office