अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- उत्तरेतील अकोले, संगमनेर या मोठ्या तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामात बरेच अडथळे आले आहेत. परंतु याच्यावर मार्ग काढत त्याचे काम प्रगतीपथावर राहिले.
आता नुकतेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, निळवंडे कालव्यांची कामे बंद पडू देणार नाही.
त्यासाठी तातडीने 175 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली जाईल. 2022 साली निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात कालव्यांद्वारे सिंचनाचे पाणी सुरू होईल.
असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला दिले. राहुरी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली.
ह्या बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नागेंद्र शिंदे आदींसह काही अधिकारी यावेळी उपस्थित होते.
निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 जानेवारी 2020 रोजी नाशिक विभागीय बैठकीत अकराशे कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
परंतु, बजेटमध्ये निधीची तरतूद झाली नाही. कालव्यांची कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. परंतु, निधीअभावी कामे बंद पडण्याची शक्यता असल्याचे कालवा कृती समितीने जलसंपदा मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com