अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-शेतकर्यांचा विश्वास संपादन करून काही व्यापाऱ्यांनी त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील तीन भुसार व्यापाऱ्यांनी आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून कुटुंबासह पसार झाल्याचे काल सकाळी उघडकीस आलेे.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यापारी सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून या गावात वास्तव्यास असून त्यांचा एक भाऊ शेजारील गावात राहत होता.
अशाच पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून तो दोन वर्षापूर्वी पसार झाला होता. मात्र या दोघा भावानी शेतकर्यांचा विश्वास संपादन केला होता.
या परिसरातील शेतकऱ्यांकडून ते भुसार मालाची खरेदी करत, शेतकरी त्यांच्याकडून गरजे नुसार पैसे घेत अनेकांना व्याजाचे आमिष दाखवून त्यांचे पैसे ठेवून घेतले होते, काल पर्यंत त्यांनी व्यापार सुरळीत सुरू ठेवला होता.
मात्र रात्रीतून घरदार वाहने सोडून ते पसार झाले. सकाळी सहाच्या सुमारास शेजारील ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर गावात चर्चा झाली आणि ही गोष्ट परिसरात वार्यासारखी पसरली.
शेतकऱ्यांच्या काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचे पैसे घेऊन व्यापारी पसार झाल्याने शेतकरी संतप्त झाले. सुमारे शंभरावर शेतकऱ्यांनी तालुका पोलीस ठाणे आणि आमदार लहू कानडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली.याबाबत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.