अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे मागील संपूर्ण वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.
कोरोनवर आता लस आली आहे. एकीकडे कोरोनाचा धोका टळतो ना टळतो तोच आता बर्ड फ्ल्यू आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे.
कोरोनानंतर या बर्ड फ्लूचे सावट श्रीगोंदा तालुक्यावर घोंगावत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पक्षी अज्ञात अजाराने मृत होण्याच्या घटना घडत आहेत.
त्यापार्श्वभूमीवर काही भागात बर्ड फ्ल्यू या आजाराची साथ पसरत असल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे त्या त्या भागातील नागरिकांना सुचना करण्यात आल्या होत्या.
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात पाच दिवसांपूर्वी एक कावळा मृत अवस्थेत सापडला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
श्रीगोंदा शहरात एक कबुतर मृतावस्थेत सापडले होते. या कबुतराचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. मृत कावळा पॉझिटिव्ह आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील कोंबड्यांची तपासणी करण्यात येत असून,
त्या भागात औषध फवारणी देखील करण्यात आली आहे. भानगाव पाठोपाठ टाकळीकडेवळीत गावात देखील आज एक कावळा मृतावस्थेत आढळला असून,
त्याचा मृत्यू कशाने झाला हे अहवाल आल्यानंतरच समजणार आहे.तरी पशुवैद्यकीय विभागाने घाबरून न जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.