अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ पाच मातब्बर नेत्यांवर भाजपने टाकली पुन्हा उमेदवारीची माळ! दोन विद्यमान आमदारांसहित दोन माजी आमदारांना संधी

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

त्यातच काल भाजपने  उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली व यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे.

भाजपने जाहीर केलेली यादी बघितली तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच मातब्बर चेहऱ्यांवर भाजपने पुन्हा विश्वास दाखवला असून यामध्ये शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मधून मोनिका राजळे,

श्रीगोंदा मधून प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड मधून राम शिंदे तर राहुरी मधून शिवाजी कर्डिले यांच्या गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे. या अनुषंगाने या पाचही उमेदवारांचे प्लस पॉईंट आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांची कामगिरी याबद्दल थोडक्यात बघू.

 अहिल्यानगर जिल्ह्यातील या पाच मातब्बर चेहऱ्यांवर भाजपने दाखवला पुन्हा विश्वास

1- राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील म्हटले म्हणजे राजकीय घराणेशाहीचा एक मोठा वारसा त्यांच्याकडे असून शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचे स्वतःचीच एक मोठी व्होट बँक आहे.

त्यांना या ठिकाणाहून सातव्यांदा उमेदवारी मिळाली असून चार वेळा काँग्रेस व एक वेळा शिवसेना तर दोन वेळा भाजपकडून ते आता रिंगणात आहेत. 2009 मध्ये काँग्रेसकडून विजयी होत त्यांनी शिवसेनेच्या राजेंद्र पिपाडा यांचा 13 हजार 306 मताधिक्याने पराभव केला होता.

तसेच 2014 मध्ये पुन्हा काँग्रेस कडून ते विजयी झाले व या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अभय शेळके यांचा तब्बल 74,662 मतांनी पराभव केला होता.

त्यानंतर मात्र काँग्रेस सोडून त्यांनी भाजपात प्रवेश केला व 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली. या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा तब्बल 87 हजार 24 मतांच्या फरकाने पराभव करत त्यांना एक लाख 33 हजार 216 मते मिळाली होती.

2- मोनिका राजळे भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून मोनिका राजळे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात व सलग दोन वेळा आमदार आहेत.

यावेळेस त्यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांचा 53,185 मताधिक्याने पराभव केला होता.

2019 ची विधानसभा निवडणूक बघितली तर यामध्ये मोनिका राजळे यांना तब्बल 12509 मते मिळाली होती व त्यांनी राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा 14,294 मतांच्या फरकाने पराभव केला होता.

3- प्रतिभा पाचपुते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला असून त्या या मतदारसंघातील मातब्बर नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

विशेष म्हणजे त्यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळवली असून त्याआधी त्यांचे पती बबनराव पाचपुते रिंगणात होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून बबनराव पाचपुते यांनी निवडणूक लढवली होती व ते विजयी झाले होते.

4- राम शिंदे कर्जत जामखेड मधून राम शिंदे यांच्यावर भाजपने पुन्हा विश्वास दाखवला असून याआधी ते दोन वेळा आमदार आहेत व भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.

राजकीय इतिहास बघितला तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केशव देशमुख यांचा पराभव करत ते विजयी झाले होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांचा 37 हजार 894 मतांच्या फरकाने पराभव केलेला होता.

परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 43 हजार 347 मतांच्या फरकाने पराभव करत रोहित पवारांनी एक लाख 35 हजार 834 मते मिळवून विजय मिळवला होता.

5- शिवाजी कर्डिले राहुरीतून दोनदा आमदार व आता चौथ्यांदा भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कडून 8333 मताधिक्याने ते विजयी झाले होते  व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजप कडून रिंगणात होते

व तेव्हा देखील विजय मिळवत राष्ट्रवादीच्या उषा तनपुरे यांचा 46 हजार 324 मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे  यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत एक लाख 9 हजार 234 मते मिळवत विजय संपादन केला होता.

Ajay Patil