आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. लोकसभा, विधानसभा,इतर निवडणूक होणार आहेत. सध्या सर्वच पक्ष या निवडणुकांच्या अनुशंघाने सध्या तयारी करत आहेत. याच अनुशंघाने काँगेसच्या वतीने आ. लहू कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात बूथ प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये कानडे यांनी भाजपवर घणाघात केला.
भाजपने उद्योगपतींना उद्योग विकले, शेतकऱ्यांना मात्र आत्महत्या करण्यास भाग पाडले, आता तरुणांनीच भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आणावा असे त्यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक कानडे, डॉ. वंदना मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, कार्लस साठे, अॅड. समीन बागवान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नेमके काय म्हणाले आ.कानडे
भाजपा सरकारने मोठमोठ्या उद्योगपतींना रेल्वे, विमानतळासह मोठमोठे उद्योग विकले आहेत. त्यातून त्यांनी पैसा उभा केला आहे. हेच उद्योगपती आता देश चालवायला लागले आहेत. तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. सोयाबीन, कांदा यांसारख्या पिकांना भाव मिळू नये, म्हणून निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे काँग्रेसने सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला.
सर्व क्षेत्रात प्रगती केली. भाजपा सरकारने सत्तेत आल्यापासून हे चक्र उलटे फिरण्यास सुरुवात केली. त्यासाठी संघटितपणे कट करून सतत दिशाभूल केली असून आता या भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आणावा, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले. निवडणूक आयोगाने ८० वर्षांपुढील व्यक्तीच्या घरी जाऊन मतदान घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधीची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आपली भूमिका व्यस्थित पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले.