महावितरण विरोधात भाजप जिल्हाभरात आंदोलन छेडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-वीजबिल भरण्याची सक्ती सरकार करत असल्याने महावितरणच्या विरोधात ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर भाजपच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन केले जाणार आहे.

उत्तर नगर जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली. गोंदकर यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलासंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही.

एकीकडे जनता आर्थिक संकटाचा सामना करत असताना महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचं काम महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने केलेले आहे. याच महावितरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन भाजपा करत आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी उत्तर नगर जिल्ह्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी महावितरणाच्या निषेधार्थ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार या महावितरणाच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन महाराष्ट्रात करणार आहे. जोपयंर्त लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा निर्णय होत नाही, तोपयंर्त आम्ही नियमित बिले भरणार नाही.

सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महावितरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असे उत्तर नगर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24