खूनशी राजकारणामुळे भाजपचे नुकसान! जुने कार्यकर्ते करताहेत भिती व्यक्त!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांना डावलण्यात आले आहे.

विधानसभेला आ. मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला थेट विरोध करणारे अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे यांना संघटनेत बेदखल करण्यात आले आहे.

खुनशी राजकाणामुळे भाजपा संघटनेचे नुकसान होण्याची भिती येथील जुने भाजपा कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत. यामुळे भाजपामध्ये नाराजी उफाळून आली आहे.

भारतीय जनता पक्षाची जम्बो कार्यकारिणी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी जाहीर केली आहे. यात ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे यांना डावलण्यात आले.

सुनिल पाखरे आणि नागनाथ गर्जे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन भाजपाच्या मूळ निष्ठावंताना डावलले आहे. मुंडे समर्थकांची कोंडी केल्याची भावना व्यक्‍त केली आहे.

आगामी काळात आ. राजळे यांना विरोध करुन त्यांना हे खूनशी राजकारण महागात पडेल, अशा इशारा पाखरे आणि गर्जे यांनी दिला आहे. ज्येष्ठ नेते अशोक गर्जे हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आहेत.

पक्ष संघटनेत अनेक पदावर त्यांनी काम केले. त्यांचा मुलगा अमोल गर्जे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना बाजूला करण्यात आले आहे.

पाखरे आणि गर्जे यांनी सदर निवेदनाद्वारे नाराजी व्यक्‍त केली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला यामुळे संघटना पातळीवर नाराजीला सामोरे जावे लागणार आहे.

तालुक्‍यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी झाल्याने भाजपाला येथे समर्थ विरोधक तयार झाला आहे. त्यात अंतर्गत गटबाजीला उधाण आल्याने भाजपाला त्याचा तोटा सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे.

आम्ही भाजपाचे आणि मुंडे समर्थक म्हणून काम करीत आहोत. आ. मोनिका राजळे यांनी आम्हाला टाळले आहे. मात्र आम्ही भाजपाचेच आहोत. वेळ येईल तेव्हा नाराजी व्यक्‍त करु.

आज संघटनेत त्यांचा वरचष्मा असला तरी मुंडे समर्थकांना डावलणे त्यांना अडचणीचे ठरेल, असे मत पाथर्डीचे भाजपा कार्यकर्ते सुनिल पाखरे यांनी व्यक्त केले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24