अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे.
तसेच महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर “हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन करण्यात येणार आहे .
कोरोनाच्या काळात महावितरणकडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे.
अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे एक कनेक्शन जरी तोडले गेले तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी श्रीगोंदा, यांना भाजपाच्या वतीने देण्यात आले आहे.