गुन्हा दाखल असताना दिले बोगस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन बडतर्फ करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-येथील शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी बोगस चारित्र्य पडताळणीचे कागदपत्र देऊन नोकरी मिळवल्याचा आरोप करुन तातडीने त्यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात तक्रारदार संकेत कळकुंबे व मिनाक्षी कळकुंबे यांनी उपोषण केले.

या उपोषणाला जय भगवान महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या (गवई गट) वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे, जिल्हाध्यक्ष रमेश सानप, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, संतोष पाडळे, पोलीस बॉईज असोसिएशनचे नितीन खंडागळे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोनूभाऊ शिंदे, हरीभाऊ डोळसे, कैलास गर्जे, मदन पालवे, प्रविण नाईक, अल्ताफ शेख, पवन भिंगारदिवे आदि सहभागी झाले होते.

शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांनी शासनापासून खरी माहिती लपवून स्वतःची बोगस चारित्र्य पडताळणी करून घेतलेली आहे. पुरवठा निरीक्षक पदावर रुजू होण्यापूर्वी बिघोत यांच्यावर 17 सप्टेंबर 2016 रोजी पोलीस तोतयागिरी प्रकरणी सिडको (जि. औरंगाबाद) गुन्हा दाखल झालेला आहे. वेळोवेळी सदर व्यक्तीस सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याकरिता तहसीलदार शेवगाव ते मुख्यमंत्री मंत्रालय स्तरावर गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करण्यात आलेला आहे.

बिघोत यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाईचा आदेश विभागीय आयुक्त साहेब यांनी देऊन सुद्धा सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सदर व्यक्ती कारवाईपासून वाचण्यासाठी पैशाचे आमिष व मारहाण करण्याचे धमक्या इतर व्यक्तीमार्फत देत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, बिघोत यांनी शासनाची फसवणुक केलेली आहे. शेवगाव येथील शासकीय कर्मचारी त्यांना या प्रकरणातून वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर प्रकरणी बिघोत यांना सरकारी सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

तरी जिल्हा प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्तांनी बिघोत यांना बडतर्फ करण्याचा आदेश दिलेला असताना त्याची अंमलबजावणी व्हावी व बोगस चारित्र्य पडताळणीद्वारे सरकारी सेवेत दाखल झालेले शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिघोत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकट- शेवगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षकांनी केलेला प्रकार हा गंभीर आहे. फसवेगिरी करणार्‍यांवर उचित कारवाई करण्याची गरज असून, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करावी. अन्यथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे जय भगवान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24