अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील कोंढा परिसरात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरचा सुळसुळाट वाढला असून हे डॉक्टर पशुपालकांना लुबाडीत आहेत.
जनतेला पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत. बोगस डॉक्टरचा गोरखधंदा सध्या श्रीगोंदा तालुक्यातील इतर गावातही सुरू आहे.
श्रीगोंदा परिसरात गाय, म्हैस यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात अनेक पदविका पास नापास झालेले लोक तसेच बोगस पशुवैद्यकीय पदविका मिळविलेले लोक जनावरांची तपासणी करतात.
तसेच आजारी गाय, म्हैस, बैल, शेळी व इतर पशुवर उपचार करून मनमानी फी उकळतात. बोगस डॉक्टरच्या उपचाराने अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत.
पण पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या घरी कृत्रिम रेतनची सोय उपलब्ध होण्यासाठी एक चांगला हेतू ठेवून गावातील दुग्ध पदविका मिळविलेल्या बेरोजगारांना काम मिळावे म्हणून कृत्रिम रेतनचे काम काही तरूणांना दिले.
हे बेरोजगार कृत्रिम रेतनाच्या कामासोबत आजारी जनावरांवर उपचार करून मनमानी फी शेतकऱ्याकडून वसूल करतात. बोगस डॉक्टरचा गोरखधंदा सध्या श्रीगोंदा तालुक्यातील इतर गावातही सुरू आहे.
वरिष्ठांकडे तक्रारी करूनही बोगस डॉक्टरांवर कारवाई झालेली नाही. सध्या बोगस डॉक्टरनी जनावराच्या औषधी पुरवठा करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच बोगस डॉक्टरांनी जनावरांवर थातूरमातूर उपचार करून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी पशुवैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.